धाराशिव (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक तथा रचनाकार पंडीत सी.आर.व्यास यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. पं. सी.आर. व्यास यांचे मुळ गाव धाराशिव येथील तेर आहे, जन्मशताब्दीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या जन्मभुमीत त्यांचे चिरंतन स्मरण व्हावे यासाठी त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असे आंतरराष्ट्रीय स्मारक धाराशिव येथे व्हावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यानी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे केली आहे.

तेर गावाला गोरोबा काकाच्या रुपाने संतपरंपरा लाभली आहे. त्याच गावातुन पं.सी.आर.व्यास यांच्यासारख रत्न देशाला मिळाले. जिल्ह्याचे भुमिपुत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असुन जिल्ह्यासाठी अभिमानाचे आहेच पण महाराष्ट्रासाठीही भुषणावह आहे. पं. सी.आर.व्यास याना भारत सरकारकडुन पद्मभुषण, मध्य प्रदेश शासनातर्फे तानसेन पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार,उस्ताद हफिज अली खान सन्मान, मराठवाडा गौरव पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारासह अनेक सन्मानानी गौरविले आहे. पं.व्यासबुवा यांची प्रतिभा पुढील पिढीला माहित होणे आवश्यक असुन त्याना प्रेरणा मिळुन सांस्कृतिक चळवळीला अधिक बळ मिळेल. व्यासबुवांची पुढील पिढी पंडीत सतिष व्यास, पंडीत सुहास व्यास, शशी व्यास हे याच क्षेत्रामध्ये तितक्याच ताकदीने योगदान देत आहेत. त्यांच्या सहकार्यातुन जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवीन दिशा मिळु शकते. हे स्मारक त्यादृष्टीने अधिक मोलाचे माध्यम ठरणार आहे. शासनाच्या माध्यमातुन पंडीत व्यासबुवा यांचा योग्य सन्मान करणे आवश्यक वाटते. ते ज्या भागात जन्मले, वाढले तिथे त्याच्या स्मृती कायम जतन करण्याची जबाबदारी शासन म्हणुन आपल्यावरच असल्याचे पाटील यानी सरकारला म्हटले आहे. आपल्या संस्कृतीचा इतिहास पाहिला तर कलाकाराचा सन्मान लोकाश्रयाबरोबर तो राजाश्रयावरही टिकुन असतो. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रत्नाची कदर शासनाने करुन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक धाराशिव जिल्ह्याच्या ठिकाणी उभा राहणे महत्वाचे आहे. स्मारकामध्ये ऑडोटीरियम, आर्ट गॅलरी अशा सुसज्ज सुविधा दिल्यास व्यासबुवाच्या स्मृती चिरकाळ टिकतील. त्यामुळे लवकरात लवकर ही मागणी पुर्ण करावी अशी मागणीही आमदार पाटील यानी केली आहे.


 
Top