धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील इंदापूर शिवारातील महामार्गावर वाटवारी करणाऱ्या टोळीतील 2 मुख्य आरोपींना पकडून 6 लाख 62 हजार 194 रूपयाचा 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे महामार्गावर होणाऱ्या नियमित वाटमारीला आळा बसेल असे बोलले जात आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नयाससोद्दीन शाहिद खान, वय 28 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मुहरैया, ता. नौगढ जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश हे कपुर डिझेल्स कंपनीचे कंटेनर मध्ये टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या 40 गाड्या भरुन म्हैसुर राज्य कर्नाटक येथुन जयपुर, राजस्थान येथे घेवून जात होते. दरम्यान दि.04 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 07.30 वाजण्याच्या सुमारास इंदापुर शिवारातील बंद असलेल्या नरसिंह साखर कारखान्या समोर एनएच 52 रोडवरील सर्व्हीस रोडलगत कंटेनर उभा करुन नयाससोद्दीन खान हे बाथरुमला जावून आले व गाडीत बसले. आनोळखी आठ ते नऊ व्यक्तींनी नयाससोद्दीन खान यांना लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण केली आणि गळ्याला चाकु लावला. तसेच खिशातील रोख रक्कम 27 हजार रूपये तसेच कंटेनर मधील टि.व्ही. एस कंपनीच्या 7 मोटरसायकल प्रति मोटरसायकल 90,742 प्रमाणे असे एकुण 6 लाख 62 हजार 194 रूपयाचा माल जबरदस्तीने काढून घेतला. या प्रकरणी नयाससोद्दीन खान यांनी दि. 5 नोव्हेंबर .2023 रोजी दिलेल्या दिलेल्या फियादेवरून गुन्हा दाखल झाला होता. 


यांनी तपास लावला

सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व पोलीस अधिकारी व अमंलदाऱ्यांच्या पथकास योग्य मार्गदर्शन करुन रवाना केली. सदर घटनास्थळाची पाहाणी करुन गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन सदरचा गुन्हा खामकरवाडी पारधी पिढी येथील सराईत गुन्हेगारांनी केल्याची खात्री झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने खामकरवाडी  येथे जावून दिपक उर्फ बबड्या रमेश काळे, दादा लाला पवार दोघेही  रा. खामकरवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान 9 जणांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीच्या टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या 7 मोटरसायकली जप्त केल्या. तसेच आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी वाशी पोलीस ठाणे येथे हजर केले.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, वलीउल्ला काझी, शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, फराहान पठाण, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, रविंद्र आरसेवाड, सुभाष चौरे, महेबुब अरब, नितीन भोसले यांचे पथकाने केली आहे.


 
Top