धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे यांच्या संकल्पनेतून आदिवासी पारधी समाजाच्या उत्थानासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत धाराशिव येथील आदिवासी पारधी समाजातील लाभार्थ्यांना शिधापत्रिका व विविध प्रमाणपत्रांचे तहसीलदार बिडवे यांच्या हस्ते वितरण गुरुवारी (दि.9) करण्यात आले. 

यावेळी बोलताना तहसीलदार बिडवे म्हणाले की, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. याबाबत धाराशिव जिल्ह्यात विविध 15 ठिकाणी कार्यक्रम घेऊन याबाबत प्रशासनामार्फत पारधी बांधवामध्ये जनजागृती करण्यात आली. त्यामुळे आदिवासी पारधी समाजातील सुमारे 1250 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना आधारकार्ड, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ अशा विविध योजनाचा लाभ मिळवून देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले आहे. समाजातील इतर बांधवानी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे असे आवाहन त्यांनी केले. 

आदिवासी पारधी समाज महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी समाजाच्या व्यथा मांडल्या. प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेच्या माध्यमातून वंचित पारधी समाजाला न्याय मिळत असल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करून ही मोहीम अधिक व्यापक करून योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

तहसीलदार यांच्या कक्षात झालेल्या या कार्यक्रमास नायब तहसीलदार श्वेता घोटकर, नायब तहसीलदार मुगावे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे, माजी नगरसेवक बापू पवार, सोलापूर येथील आदिवासी प्रकल्पचे सहायक प्रकल्प अधिकारी डी. डी. झाकर्डे, कार्यालयीन अधीक्षक व्ही. वाय. सरतापे, संजू पवार, सुरेश काळे, दादा काळे, छगन पवार, जगू काळे, तानाजी चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी, पारधी समाजातील लाभार्थी पुरुष, महिला उपस्थित होते.


 
Top