धाराशिव (प्रतिनिधी)-छगन भुजबळ यांच्यासोबत 12 आमदार फुटले. नारायण राणे व गणेश नाईक यांच्यासोबत कोणीही फुटले नाही. तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत 40 आमदार फुटले. 40 आमदारांची नाराजी उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातली असती आणि जर उध्दव ठाकरे त्यांच्याशी बोलले असते तर शिवसेना फुटली नसती. केवळ चुकीच्या सल्लागारामुळेच शिवसेना फुटली. हे त्या सल्लागारांचे अपयश आहे असे मत शिंदे गटाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

गुरूवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्रा. रविंद्र गायकवाड यांनी धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धनुष्य बाणावर पाच वेळेस लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार झाले आहेत. असे सांगून धाराशिव लोकसभा निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर टाकली आहे. या लोकसभा मतदार संघातील मतदार धनुष्य बाणावर प्रेम करणारे लोक आहेत. आपण वारकरी संप्रदायांचे असून, दिलेली संपर्कप्रमुखांची जबाबदारी कार्तिकी एकादशीपासून पार पाडत आहे. आपण धाराशिव लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे प्रा. गायकवाड यांनी सांगून वरच्या पातळीवर जर ही जागा भाजपा किंवा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यास आपण त्यांना निवडून आणू असा दावाही प्रा. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला.


बाळासाहेब असते तर...

गेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी माझी उमेदवारी फायनल झाली होती. परंतु जेवायला गेलो आणि घात झाला. असे सांगून बाळासाहेब ठाकरे असते तर माझी उमेदवारी कायम राहिली असती. ज्यांना उमेदवारी मिळत नव्हती अशा लोकांना मी त्या काळात विधानसभा व लोकसभेची बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नाहीतर कर्नाटक मधील काही जागेवर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलवून उमेदवार दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर चुकीचे लोक उध्दव ठाकरे यांचे सल्लागार झाले. त्यामुळे सेना फुटली. 


नॉट रिचेबल खासदार

यावेळी पत्रकारांनी आपण खासदार असताना आपला मोबाईल कायम बंद होतो. त्यामुळे आपणास नॉट रिचेबल खासदार असा शिक्का बसला. या विषयी विचारले असता प्रा. गायकवाड यांनी आपला मोबाईल बंद जरी असला तरी ज्यांचे कामे होते त्यांना माझ्या सोबत कोण आहे हे माहित असल्यामुळे संबंधितांना फोन करून मला काम सांगत होते. अशा पध्दतीने मी अनेकांची कामे केली. यापुढे मात्र आपला फोन कायम चालू राहिले असे सांगितले. 


आरक्षण विषय लोकसभेत मांडला होता

सध्या मराठा, धनगर आरक्षण विषयी आंदोलने राज्यात सुरू आहेत. आपण या आंदोलनाकडे कसे पाहता यासंदर्भात विचारले असता प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मी खासदार असताना जी भूमिका लोकसभेत मांडली होती तीच भूमिका आजही माझ्या कायम आहे. आरक्षणामुळे जे सुधारले आहेत त्यांनी आरक्षण न घेता वंचित लोकांसाठी आरक्षण द्यावे, असे सांगून शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण घेणे आजही अवघड झाले आहे. शेतमालाला भाव नाही. वेळेवर पाऊस नाही. शेतीचे उत्पन्न म्हणावे तसे नाही. त्यामुळे सरकारने आर्थिक सुधारलेल्या लोकांचे आरक्षण काढून वंचित लोकांना आरक्षण द्यावे ही आपली भूमिका कायम असल्याचे प्रा. गायकवाड यांनी सांगितले.


 
Top