धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड खर्च कपातीचा नवा मानदंड रचला आहे. मागील वर्षीच्या हंगामात ऊसतोड खर्च कपातीत आंबेडकर कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. ऊसतोड आणि वाहतूक खर्चापोटी प्रतिटन केवळ 549 रूपये 80 पैसे एवढी खर्चकपात करण्यात आंबेडकर कारखान्याला यश आले आहे. सर्वात कमी खर्चकपात करणाऱ्या राज्यातील पाच कारखान्यांपैकी धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकर आणि नॅचरल शुगर या दोन कारखान्यांचा समावेश आहे.
राज्यात प्रचलित पध्दतीनुसार साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभी केली जाते. या यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यावतीने त्यांच्या ऊसाची तोडणी व वाहतूक केली जाते. तोडणी आणि वाहतुकीपोटी आलेला खर्च ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एफआरपी म्हणजेच देय असलेल्या रकमेतून खर्च केला जातो. गतवर्षी खर्च करण्यात आलेल्या ऊसतोडणी व वाहतूक खर्च कपातीची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी साखर आयुक्त डॉ. चंंद्रकांत कुलकुंडवार यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. राज्यातील सहकारी, खासगी कारखान्यांचे कारखानानिहाय खर्चकपातीची रक्कमच साखर आयुक्तांनी घोषित केली आहे. विविध शेतकरी संघटना या खर्चावरून सातत्याने आक्षेप व्यक्त करीत होते. त्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक महत्वाचे मानले जात आहे.
राज्यात मागील वर्षीच्या हंगामात ऊसतोड आणि वाहतूक खर्चकपात करणाऱ्या राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील रिलायबल शुगर ॲन्ड डिस्टलरी पॉवर लिमिटेड यांनी शेतकऱ्यांच्या देय रकमेतून वाहतूक आणि तोडणी खर्चापोटी एक हजार 218 रूपये अहमदनगर जिल्ह्यातील साजन शुगर प्रा. लि. ने एक हजार 146 रूपये, भंडारा येथील मानस ॲग्रो इंडस्ट्रीजने एक हजार 82 रूपये, नाशिक जिल्ह्यातील धाराशिव शुगर लिमिटेडने एक हजार 61 रूपये तर छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर शुगर प्रा. लि. या कारखान्याने एक हजार 55 रूपये इतकी प्रति मेट्रीक टन शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून खर्चकपात केली आहे.
सर्वात कमी ऊसतोडणी व वाहतूक खर्चकपात करणारे कारखाने
धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना प्रतिटन 549.80 खर्चकपात. अहदमनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी सा. का. प्रतिटन 621.25 खर्चकपात. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखाना प्रतिटन 626.52 रुपये खर्चकपात. धाराशिव जिल्ह्यातील नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रतिटन 639.22 रुपये खर्चकपात. सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखाना प्रतिटन 656.28 रुपये खर्च कपात.
.
साखर उतारा आणि एफआरपीतही प्रगती
मागील वर्षी 10.25 टक्के उताऱ्यासाठी प्रतिटन तीन हजार 50 रूपये एफआरपी निर्धारित करण्यात आला होता. साजन शुगर या खासगी साखर कारखान्याचा सरासरी उतारा 10.04 टक्के आणि एफआरपी दर दोन हजार 985.85 रूपये आहे. त्यामध्ये प्रतिटन एक हजार 146.92 एवढी ऊसतोड व वाहतूक खर्च कपात करून शेतकऱ्यांना एक हजार 838.93 रूपये मिळाले आहेत. तर धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा 10.61 टक्के आणि प्रतिटन एफआरपी दर तीन हजार 159.80 आहे. त्यातून ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चापोटी प्रतिटन केवळ 549.80 रूपये वजा करून शेतकऱ्यांना प्रतिटनास दोन हजार 610 रूपये एवढा दर दिला आहे. - यशवंत गिरी, साखर संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय पुणे.