तुळजापूर (प्रतिनिधी)- दिपावली सुट्यांच्या पार्श्वभूमीवर  गुरुवार पासुन सध्या श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ  भाविकांची मोठी  गर्दी  होते.  या वाढत्या भाविकांच्या संखेच्या पार्श्वभूमीवर असणारे नियोजन कोलमडल्याने भाविकांना गैरसोयीस सामोरे जावे लागले. श्री तुळजाभवानी दर्शनार्थ दररोज लाखोच्या संखेने गर्दी होत आहे. 

यात प्रामुख्याने शहरी भागातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. हा भाविकांचा असाच ओघ दिवाळी सुट्या संपेपर्यत राहणार असल्याने सुट्यांच्या काळात भाविकांना सुलभ दर्शनासाठी दररोज मंदिर पहाटे एक वाजता खुले करण्यात येणार आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर सलग बावीस तास दर्शनार्थ उघडे ठेवले जात आहे. शुक्रवार रोजी दर्शन मंडपातील भाविकांची रांग पहाटेच दर्शन मंडप बाहेर आली होती. तर अभिषेक सशुल्क दर्शन रांगा संभाजी प्रांगणात गेल्या होत्या. दिवसभर मंदिर भाविकांनी हाऊसफुल्ल झाले होते. 


बाहेर पडण्याचा मार्ग अतिक्रमण मुळे अरुंद !                          .

मंदिर महाध्दार समोर मातंगीदेवी मंदिर समोरुन बाहेर पडणा-या मार्गावर दुकानदारांनी प्रचंड अतिक्रमणे केल्याने मंदिरात प्रवेशासाठी वीस फुट महाध्दार आहे. तर बाहेर पडण्यासाठी चार फुटाचा रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मंदिर महाध्दार समोर दुचाकी, हातगाडी, बांगड्यावाले सह अनेक किरकोळ व्यापारी वर्गाने अतिक्रमणे केले होते.


तिर्थक्षेञीला आले वाहनतळाचे स्वरुप! 

श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ खाजगी वाहनांनी भाविकांनी येणे पसंत केल्याने शुक्रवार शहरात भाविकांच्या मोठ्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे शहरातील रस्त्यावर, चौकांमध्ये वाहतुक कोंडी होत होती. राजमाता माँ जिजाऊ महाध्दार समोर कित्येक हजार नारळ फोडले गेल्याने या भागात सर्वञ चिखलमल व निसरडे वातावरण दिवसभर होते.


 
Top