धाराशिव (प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून राज्यात लम्पी आजाराबरोबरच इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पशुसंवर्धन विभाग मात्र सुस्त पडलेला दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. हि बाब निदर्शनास आणून देत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी विद्यार्थी संघटनांना निवेदने देत आंदोलनं करायला लागली. यानंतर राज्यात पशुसंवर्धन विभागातील विविध संवर्गातील 446 पदांची दोन महिन्यापूर्वी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाली मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी विभागाला मुहूर्त भेटत नाही अशी परिस्थिती आहे. याबाबत नुकतेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल महामुनी यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, या विभागाचे सचिव तुकाराम मुंडे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन देऊन तातडीने या विभागाचा निकाल लावण्याची विनंती केली असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांनी दिली.

राज्यातील पशुवर्धन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात 26 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक 376 , वरिष्ठ लिपिक 44, लघुलेखक (उच्च श्रेणी) (गट-क)-2 , लघुलेखक (निम्नश्रेणी गट-क)-13, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क ) -4, तारतंत्री (गट-क)-4 यांत्रिकी (गट-क)-2, बाष्पक परिचर (गट-क) -2 आदी 446 पदांचे अर्ज मागवून आयबीपीएस या खाजगी कंपनीकडून 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजुन निकाल लागलेला नाही. पशुसंवर्धन विभागाने निकाल कधी लागेल, याबाबत आपल्या संकेतस्थळावर देखील काहीही माहिती दिलेली नाही. यामुळे उमेदवारांमध्ये मात्र तीव्र नाराजी असुन पशुसंवर्धन विभागाने लवकरात लवकर या परीक्षांचा निकाल जाहीर करावा,अशी विद्यार्थ्यांनी मागणी आहे. 

 परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व जलद होण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्या 900 ते 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारात आहेत. मात्र वारंवार परीक्षा प्रक्रीयेत गोंधळ, विदयार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्र मिळणे, पेपरफुटी, निकालातील विलंब, अशा गोष्टी समोर येत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या या परीक्षे संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सुरुवातीपासुन पाठपुरावा करत आहे. या महिन्याअखेर निकाल लागला नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी महसूल मंत्र्यांना काळे झेंडे दाखवतील, असा इशाराही निंबाळकर यांनी दिला आहे.


 
Top