धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.31 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. शासनाने आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही.

त्यामुळे जरांगे यांना समर्थन देण्यासाठी व सकल मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिलावती प्रभाकर देशमुख व मनिषा शिवाजी पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच ॲड. गुणरत्न सदावर्तेनी वारंवार मराठा समाजाला हिणवले आहे. त्याबरोबरच सरकारने महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा आंदोलकावर कोणताच गुन्हा नोंद करुन नये. अन्यथा जे आत्महत्या केलेले युवक आहेत. त्यांच्या आत्महत्येला हे तिघाडी सरकार जबाबदार राहील. त्यामुळे त्यांच्यावरही खुनाचा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच सकल मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातून तात्काळ आरक्षण मंजुर करुन मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जोपर्यंत मराठा समाजाची मागणी मंजुर होत नाही. तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. देशमुख व पाटील यांच्यासोबतच शशिकला गजेंद्र गुंजकर, उज्वला अंगद फाटे, सारिका विद्यासागर कोळगे, आनंदी आनंद पाटील, शितल विशाल समुद्रे, विजयमाला बाबासाहेब साळुंके, ज्योती सुधीर नन्नवरे, व सरोजा रमाकांत शिंदे यांनी देखील याआमरण उपोषणामध्ये सहभाग नोंदविला आहे.


 
Top