नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील इंदिरानगर येथील नागरीकांनी आम्हाला तात्काळ आम्ही राहत असलेल्या जागेचा कबाला देण्यात यावा अन्यथा दि.16 नोव्हेंबर पासुन नळदुर्ग नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 30 ते 35 वर्षांपासुन आम्ही इंदिरानगर येथे बेघरांसाठी राखीव असलेल्या सर्वे नं.236/1/3 मध्ये सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहोत. याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सर्व सोई सुविधाही पुरविण्यात आलेल्या आहेत. मात्र अद्याप सदरील जागेच्या नोंदी या आमच्या नावाने झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला या जागेवर प्रधानमंत्री आवास योजना किंवा रमाई घरकुल योजना यासारख्या कोणत्याही शासकीय योजनेचा आम्हाला लाभ मिळत नाही.

आम्ही राहत असलेल्या जागेचा कबाला मिळावा व सदरील जागेवर आम्हास घरकुल सारखी योजना राबविता यावी म्हणुन आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केल्यानंतर नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने आम्हाला जा. क्र.431/नपन/2023 अन्वये दि.18 जुलै 2023 रोजी नोटीस देण्यात आली असुन त्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे दि.17 जुलै 2023 रोजीच्या पत्राचा संदर्भ देत त्यान्वये वरील दोन्ही आवास योजनांचा लाभ देण्यासाठी आमच्याकडुन विहीत नमुन्यात प्रस्ताव मागवुन घेण्यात आला होता. त्यावेळी सदर प्रस्ताव आम्ही दाखल करूनही आम्हाला आजपर्यंत या योजनांचा लाभ1मिळाला नाही. त्याचबरोबर आपल्या कार्यालयाशी कबाला मिळावा म्हणुन आम्ही दाखल केलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी व आम्ही राहत असलेल्या जागेचा आम्हाला कबाला देऊन सदरील जागेवर आम्हाला घरकुल योजनेचा लाभ द्यावा. येत्या 10 दिवसात आम्हाला कबाला मिळाला नाही तर दि.16 नोव्हेंबर 2023 पासुन आम्ही नळदुर्ग नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. हे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर कल्पना गायकवाड, शशिकांत घोडके, ज्ञानेश्वर घोडके, वसंत घोडके, बेबाबाई जाधव, जिजाबाई गुरव, बायडाबाई कांबळे, लक्ष्मी कोळी, कमलाबाई घोडके, संगीता वाघमारे, अहमद शेख मनिषा निर्मळे, अंबुबाई भोई, विठाबाई कांबळे, महादेवी बताले, फातिमा शेख, शांताबाई देडे, संदीपान शेंडगे, भारतबाई जाधव, दिलीप गायकवाड, छायाबाई कांबळे, माया कांबळे, असिफ शेख, इरप्पा मसनजोगी,सुनिल बनसोडे, राम सोमवसे, महाबुबबी शेख, राजेश माने, प्रमिला ठाकुर, सुनिता मुळे, दौलतबी पठाण, नमजुन शेख,अंबादास पवार, चंद्रकांत जाधव, सुर्यकांत घोडके, विलास मोरे यांच्यासह 54 नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top