धाराशिव (प्रतिनिधी)-मराठ्यांचे क्रांतिसूर्य, आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणारे स्व.अण्णासाहेब जावळे यांच्या समाधीस्थळी टेंभी (ता.औसा) येथे बुधवार, दि.1 नोव्हेंबर रोजी आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ही आक्रोश सभा आयोजित केली आहे. या सभेत अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील हे संबोधित करणार आहेत. तरी या सभेला लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी सभेला उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय छावा संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.

जिल्हाध्यक्ष साळुंके म्हणाले की, मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळापासून अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना कायम सोबत घेऊन चालणारा समाज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्व.अण्णासाहेब जावळे यांनी मागे पडत चाललेल्या मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले. त्यांच्या हयातीत आरक्षण मिळाले नाही, परंतु सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षणासोबत असलेल्या सर्व संघटनांना अखिल भारतीय छावा संघटनेचा कायम पाठिंबा आहे. म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला आरक्षण देण्याची सदबुद्धी मिळावी म्हणून मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्व.अण्णासाहेब जावळे यांच्या समाधीस्थळी म्हणजेच टेंभी (ता.औसा) येथे बुधवार, दि.1 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपर्र्यंत मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाने सर्व जातीधर्मातील लोकांना सांभाळून घेतले. परंतु आता याच समाजावर दुर्दैवी वेळ आल्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी धडपडत आहे. म्हणून इतर जातीधर्मातील बांधवांनीही मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. टेंभी येथे होत असलेल्या या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहनही छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.


 
Top