धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ईटकूर येथे एका इसमाने मक्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती कळंब पोलिस ठाण्यास मिळाली होती. त्यानुसार कळंब पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर 5 नोव्हेंबरच्या रात्री संबंधित इसमाच्या शेतात जावून पाहणी केली असता 4 गुंठ्यामध्ये 500 किलो 500 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकूण किंमत 60 लाख 06 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसमास अटक करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 04/11/2023 रोजी कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक, सुरेश साबळे यांना गोपनिय माहिती मिळाली की, इटकुर ता.कळंब जि.धाराशिव येथे एका इसमाने त्याचे शेतात स्वता:च्या आर्थीक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिर रित्या गांज्याच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर कळंब पोलिसांनी इटकुर शिवारात शेत गट नं 1201 मध्ये शेतकरी इसम दशरथ संपती काळे रा.इटकूर याने मकाच्या शेतात अवैध गांज्याचे झाडे लावुन त्याचे संवर्धन करीत असताना मिळुन आला. त्याचे शेतातुन एकुण 500 किलो 500 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकुण किंमत 60 लाख 06 हजार रूपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर शेतकरी यांचे विरुध्द कळंब पोलीस स्टेशन येथे गुरनं 476/2023 कलम 20 एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, हनुमंत कांबळे, सुनिल कोळेकर, बाळासाहेब तांबडे, पांडुरंग माने, दत्तात्रय शिंदे, अजिज शेख, शिवाजी राऊत, सविता कांबळे, भरत गायकवाड, करीम शेख, वैजिनाथ मोहीते, फुलचंद मुंढे, रणजित लांडगे, रोहीणी चव्हाण, परमेश्वर मगनाळे यांचे पथकाने केली आहे.


 
Top