तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यामध्ये दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुळजापूर येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या दरम्यान कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सदरील हवामानाचा अंदाज लक्षात घेता खरीप हंगामातील काढणी झालेल्या व मळणी करावयाची राहिलेल्या सोयाबीन पिकाच्या गंजी ताडपत्रीने झाकून ठेवाव्यात जेणेकरून पावसामुळे भिजून होणारे संभाव्य नुकसान टाळले जाईल असे आव्हान जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर मार्फत करण्यात आले आहे.