धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचे देय असलेले 2394 कोटी रूपये देण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, सन 2020 ते 2023 मधील शेतकऱ्यांचे विविध पीकविमा कंपनीकडून तसेच राज्य शासनाकडे विविध अनुदानापोटी जवळपास 2394 कोटी रूपये थकीत आहेत. 2020 च्या पीकविमा नुकसान भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना देखील पीकविम्यापासून शेतकरी वंचित आहेत. धाराशिव जिल्ह्यात फक्त तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. उर्वरित पाचही तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. उर्वरित कांदा अनुदान त्वरीत द्यावे, दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रूपये शासकीय अनुदान द्यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च दाबाने नियमित व दिवसा वीज पुरवठा करावा आदी मागण्या असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दिनेश बंडगर, पिंटू कोकाटे, शाम जाधव, बंडू आदरकर, सतिश सोमाणी आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाकरे सेनेने नौटंकी बंद करावी-नितीन काळे
पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी अग्रीम पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 161 कोटी 80 लक्ष रुपये वितरित करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असताना ठाकरे सेनेच्या खासदार आणि आमदारानी धरणे आंदोलन करून थयथयाट केला. चमकोगिरी करण्यासाठी केलेल्या या आंदोलनाचा सर्वसामान्य जनतेवर कसलाही परिणाम होणार नाही, हे त्यांनी लक्षात घेऊन इव्हेंट नौटंकी बंद करावी. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसल्या प्रकारे मदत करण्यात आली नाही. अशी घणाघाती टिका भाजपाचे लोकसभा संयोजक नितीन काळे यांनी केली आहे.