धाराशिव (प्रतिनिधी)-अक्षरवेल महिला साहित्य मंडळातून सातत्यपूर्ण प्रकाशित होणारा “अंकुर “या दिवाळी अंकाचे यावर्षीही थाटात नुकतेच प्रकाशन करण्यात आले. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही लेखन चळवळ आहे. प्रकाशित दिवाळी अंकाचे हे अठरावे वर्ष आहे. यावर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय कैं. ना. धो. महानोर स्मृती विशेषांक असा आहे. असे सांगून या प्रकाशन प्रसंगी अक्षरवेल मंडळाच्या नूतन अध्यक्ष डॉ. सुलभा देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व विषद केले.
महिलांनी चालवलेली ही अक्षरवेल चळवळ पूर्ण महाराष्ट्रात एकमेव आहे असे विचार त्यांनी केले. दिवाळी अंक सतत अठरा वर्षे काढणे ही सोपी गोष्ट नाही असे मत मांडले. अक्षरवेलच्या मार्गदर्शिका डॉ. अनार साळुंखे म्हणाल्या की हा दिवाळी अंक म्हणजे रानकवी महानोर यांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली ठरेल. कार्यकारी संपादक कमलताई नलावडे यांनी अक्षरवेलचा हा विशेषांक महानोरांवर संशोधन करणाऱ्यांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल असे मत मांडले. तर दिवाळी अंकाच्या संपादक डा.रेखा ढगे म्हणाल्या की हा अंक अक्षरवेल महिला मंडळातील सर्व सदस्यांचे सामूहिक यश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सोनाली दिक्षीत यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिव अपर्णा चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी किरण देशमाने, सुनीता गुंजाळ, ज्योती कावरे, अनिता पडवळ, शिवनंदा माळी, मीना महामुनी, सुमित्रा अटपळकर, अर्चना गोरे, अनिता गोरे, ज्योती मगर,मंजुश्री भुतेकर, सविता माळी, जयश्री फुटाणे यांनी परिश्रम घेतले.दिवाळी अंक ए फोर साईजचा व 120 पेजेसचा आहे. अतिशय आकर्षक सुंदर व बोलके“ मुखपृष्ठ आहे. धाराशिव नगरीतील लेखिकासह संपूर्ण महाराष्ट्रातून कवयित्री, गझलकारा यांनी अंकांमध्ये लेखन केलेले आहे.