धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला असून, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, रात्री शेतात मुक्काम करू नये, गटाने फिरावे, लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये, जनावरांना बंदिस्त ठिकाणी बांधावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

दरम्यान, जागोजागी सापळा लावून वरवंटी शिवारात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त सुरू केली आहे. वरवंटी येथील शिवारात 30 सप्टेंबर रोजी सायं 4.00 ते 4.30 च्या दरम्यान वासरावर हल्ला करून बिबट्याने त्याला मारल्याची घटना समोर आली असून, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी वन अधिकारी तसेच कर्मचारी यांनी जागेची पाहणी केली असता हल्ला बिबटयाने केल्याचे दिसून आले आहे. हल्ल्यात मेलेल्या वासराचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले व घटनेचा पंचनामा, पशुधन मालकाचा जवाब नोंदविण्यात आला.

तसेच 2 ऑक्टोबर 2023 रोजी वन कर्मचान्यांसमवेत पाहणी केली असता मृत वासराचे शरीर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वरवंटी (ता. जि. धाराशिव) येथील फॉरेस्ट गट क्र. 107 मध्ये ओढत नेऊन खाल्ल्याचे निदर्शनास आले असून, यादिवशी संपूर्ण परिसरात गस्त घालण्यात आली. सायंकाळी मृत वासराचे शरीराजवळ ट्रॅप कॅमेरे लावून परिसरातील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वरवटी, कामठा, अपासंगा, गावसुद, वडगाव व इतर गावात खबरदाराचा उपाय म्हणून वन कर्मचारी यांना तैनात केले असून सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे, शेतात रात्री बेरात्री मुक्काम न करण्याचा साथ सलोख्याचे नियम पाळून, समुहाने, गटाने शेतकामास जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करु नये, लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये, जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे तसेच सोशल मिडीयावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बिबटयासंदर्भात बिबट्याची अनधिकृत माहिती इतर प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत असून, अफवांवर विश्वास ठेवु नये. बिबट्या वन्यप्राण्यासारखा प्राणी आपणास आढळल्यास त्याची प्रथमतः वन विभागास / गावचे सरपंच / पोलीस पाटील यांना कळवावे व अफवा पसरण्यापासून दूर रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी जनतेने सावधानता बाळगावी, असे आवाहन विभागीय वन अधिकारी यांनी केले आहे.

हजार हेक्टरच्या जंगलात बिबट्याचा वावर

बालाघाटच्या डोंगररांगा आणि वन विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीमुळे धाराशिव तालुक्यातील वडगाव (सि.), वरवंटी, तुळजापूर तालुक्यातील कामटा, अपसिंगा, कात्री शिवारात सुमारे 1 हजार हेक्टरवर जंगल तयार झाले आहे. या जंगलात बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. बिबट्या जंगलाच्या बाहेर पडत नाही, मात्र, जंगलात चरण्यासाठी येणाऱ्या जनावरांचा फडशा पाडत आहे. त्यामुळे भीती निर्माण झाली आहे.


 
Top