उमरगा (प्रतिनिधी)-मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील गावागावात लढा उभारला जात असून खासदार, आमदार यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय दिवसेंदिवस वाढत असून गावांच्या वेशीवर प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी 25 ऑक्टोबर पासून रात्रंनदिवस तहसील कार्यालयासमोर आमरण अन साखळी उपोषणा सुरू असून मंगळवारी (31) सातव्या दिवशी अण्णासाहेब पवार याचे आमरण उपोषण सुरूच आहे.

मराठा रणरागिणी यांनीहि आरक्षण लढ्यात सहभाग नोंद करत साखळी उपोषणाला तालुक्यातील बेडगा येथील अनिल माने, संजय माने, प्रभाकर माने, दिनकर माने, अमित माने, विनायक माने, मल्लिनाथ लोहार, बालाजी वडजे या गावातील युवक बसले आहेत. यांना पाठिंबा देण्यासाठी बेडगा गावातील शकडो महिला व नागरिक सहभागी झाले आहेत. आमरण उपोषण व सात दिवसा पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणास मराठासमाज  आरक्षणाबाबत खासदार, आमदार कोणतीही भूमिका घेताना दिसत नसल्याने सकल मराठा समाजात सरकार व लोकप्रतिनिधी बदल असंतोष आहे. सर्वसामान्य अन गरीबांच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे असे त्यांना वाटत नसल्यामुळे गावोगाव लोकप्रतिनिधीना प्रवेश नाकारला जात आहे. दरम्यान मंगळवारी या आमरण उपोषणाला बेडगा ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. तालुका हिंदू खाटीक समाज मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी आणि आर्य वैश्य कोमठी समाजाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांनी भेट घेवून आमरण उपोषण व साखळी उपोषणाला पाठिंबा दिला. तालुक्यात सात गावात साखळी तर तीन गावात आमरण उपोषण सुरू असून उमरगा,मुरूम,कदेर, मूळज, कोराळ, कवठा, मूळज, कराळी या सात गावात साखळी उपोषण तर उमरगा, कदेर, कवठा या गावात आमरण उपोषणासह साखळी उपोषण सुरू आहे.

      बलसूर गावात टायर पेटवून रोखला रस्ता

तालुक्यात सात गावात साखळी उपोषण व तीन गावात आमरण व साखळी उपोषण सुरू असून सकल मराठा समाजाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर मागील सात दिवसापासून साखळी उपोषण आणि तीन दिवसापासून आमरण उपोषण शांततेत सुरू असताना सोमवारी (30) अज्ञात व्यक्तीकडून सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनाला गालबोट लावण्याच्या हेतूने बस जाळणे व मंगळवारी बलसूर गावात मुख्य रस्त्यावरती टायर टाकून पेटवून रस्ता रोखण्यात आला होता. टायर पेटवून दिल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान उमरगा आगारातून बससेवा बंद करण्यात आली असून बाहेर जिल्हा व राज्यातील बसेस दिवसभर बंद असल्याने खाजगी वाहनाने नागरिकांना प्रवास करावा लागला. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचार बंदी आदेश लागू केले असल्याने तालुक्यातील बाजारपेठ व शाळा, महाविद्यालय संबंधितांनी स्वतःहून बंद ठेवण्यात आली होती.


 
Top