नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्याच्या तटबंदी तसेच बुरुजांवर सध्या मोठ्याप्रमाणात झाडे, झुडपी वाढली असुन यामुळे किल्ल्याच्या तटबंदीसह बुरुजाना धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व विभागाने तात्काळ याची दखल घेऊन किल्ल्याच्या तटबंदी व बुरुजांवर मोठ्याप्रमाणात वाढलेली झाडे, झुडपे काढुन टाकावे अन्यथा केवळ या झाडांमुळे किल्ल्याची तटबंदी तसेच अनेक बुरुज ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नळदुर्गचा प्राचिन व ऐतिहासिक किल्ला सध्या किल्ला जतन व संगोपन योजनेअंतर्गत युनिटी मल्टिकॉन्स कंपनीकडे देण्यात आला आहे. युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने किल्ल्यात अतीशय चांगले काम करून किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिले आहे. युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने किल्ल्यात केलेल्या योजनाबद्ध कामांमुळे तसेच पर्यटकांना उपलब्ध करून दिलेल्या सोई सुविधांमुळे गेल्या कांही वर्षात किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. याचे सर्व श्रेय युनिटी मल्टिकॉन्स कंपनीकडे जाते. कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी, संचालक जयधवल करकमकर व संचालिका वैशाली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यात युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने किल्ल्यात अतीशय चांगल्या प्रकारे काम केले आहे. मात्र किल्ल्याच्या तटबंदीवर तसेच बुरुजांवर सध्या जी मोठमोठे झाडे झुडपे वाढली आहेत याकडे युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे दुर्लक्ष का झाले हे समजत नाही त्याचबरोबर या गंभीर बाबीकडे पुरातत्व विभागाचे लक्ष का गेले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वास्तविकपाहता पुरातत्व विभागाचे अधिकारी नेहमीच या किल्ल्यात किल्ल्याची पाहणी करण्यासाठी येत असतात त्याचबरोबर याठिकाणी पुरातत्व विभागाचे कर्मचारीही आहेत असे असताना किल्ल्याच्या तटबंदीवर तसेच बुरुजांवर मोठ्याप्रमाणात वाढलेल्या झाडा झुडुपांकडे यांचे लक्ष का जात नाही? किल्ल्यातील उपली बुरुज परीसरातील किल्ल्याची तटबंदी तसेच बुरुजांवर मोठमोठे झाडे आली आहेत. ही बुरजावरील तसेच तटबंदीवर आलेली झाडे झुडपे ती लहान असतानाच काढणे गरजेचे होते. आज ही झाडे झुडपे मोठी झाल्याने या झाडांची मुळे तटबंदी व बुरुजांच्या आत मध्ये खोलवर घुसली आहेत यामुळे तटबंदीसह बुरुजांना यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज गड–किल्ल्यांचे जतन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्यसरकारकडुन मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले जात आहे. यासाठी लाखो कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.असे असताना नळदुर्गच्या प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्याची अशी अवस्था का झाली याची चौकशी होणे गरजेचे आहे.केवळ किल्ल्याच्या तटबंदी व बुरुजांवर वाढलेल्या झाडांमुळे ही किल्ल्याची तटबंदी व बुरुज ढसाळू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाने याची दखल घेऊन तात्काळ नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील तटबंदी व बुरुजांवर मोठ्याप्रमाणात वाढलेली झाडे,झुडपे काढण्याचे आदेश द्यावेत किंवा काढुन घ्यावेत अशी मागणी होत आहे.


 
Top