धाराशिव (प्रतिनिधी)- समाज कल्याण विभाग धाराशिव व यश मेडिकल फाउंडेशन येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. 7 ऑक्टोबर) रोजी व्यसनमुक्ती कार्यशाळा भोसले हायस्कूल जूनियर कॉलेज धाराशिव येथे संपन्न झाली.
कार्यक्रमात बोलताना डॉ.तांबारे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे शरीराची, कुटुंबाची व समाजाची कशी हानी होते हे विद्यार्थ्यांना उदाहरणासह पटवून दिले. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे मोबाईल हे सुद्धा कसे व्यसन होऊन जाते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थी प्रथम फॅशन म्हणून व्यसन करतात परंतु त्यातून ते बाहेर न निघता पूर्णपणे त्यातच गुरपटून जाऊन आपले आयुष्य बरबाद कसे करतात याचेही विद्यार्थ्यांना समर्पक उदाहरणे देऊन पटवून दिले.
यावेळी बोलताना उपमुख्याध्यापक कोळी म्हणाले की व्यसन ही समाजाला लागलेली मोठी कीड असून विद्यार्थ्यांनी तर व्यसनमुक्त राहावेच परंतु कुटुंबातील काही व्यसन करणारी असतील तर त्यांनी डॉक्टर तांबारे यांच्याकडे समुपदेशन व उपचारासाठी घेऊन जाण्याचेही आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कोळी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप तांबारे उपस्थित होते. यावेळी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक राजेश तामाने,भोसले कॉलेजचे एन,आर.नन्नवरे, एस.व्ही.पाटील, घोडके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक घोडके यांनी केले. तर आभार एन. आर. नन्नवरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोसले हायस्कूलचे कर्मचारी व येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.