तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे जागृत हिंगळजदेवी मंदीर आहे. या मंदिरात देवी तांदळा रुपात पुजली जाते . त्यासोबतच एक शिव मंदीर व दिपमाळही आहे.
मंदिराची अख्यायिका अशी आहे की, हजारो वर्षांपूर्वी हा परिसर (हिंगळजवाडी गावाच्या आजुबाजूचा) पुर्ण जंगलमय असा होता. जंगलामध्ये काही साधु-सन्याशी फिरत फिरत आले. साधुनी जंगलामध्ये एक शिवलिंग जे शिव मंदिर आता डोगलेश्वर म्हणून ओळखले जाते ते स्थापन करून त्याची नित्यनेमाने पुजा करत होते.
इकडे राजवाड्यातील (राजवाडा म्हणजे आत्ताचे भगवान श्री दत्त मंदिर) राजाला ही गोष्ट माहिती होताच राजाने काही सेवक पाठवुन त्या साधूंना राजवाड्यात येण्याची विनंती केली. राजाच्या आग्रहाखातर साधू राजवाड्यात आले व त्यांची विचारपुस करुन त्यांना बसण्यासाठी आसने टाकली ,सन्याशांचा पाहुणचार करण्यासाठी राजाने शिपायांना आज्ञा केली की, सर्व महंतांची जेवण्याची व्यवस्था करा. सन्याशांनी जेवणास नकार दिला नंतर राजाने शिपायांना सांगितले की महंतांसाठी दुधाची सोय करा ,शिपाई हातात भांडे घेऊन बाहेर गेला परंतु त्याला दुध मिळाले नाही,शिपाई रिकाम्या हाताने परत आला राजाच्या राजवाड्यात एक वांझ गाय होती संन्याशाची दृष्टी त्या गायीवर गेली व तो म्हणाला की, या गायीचे दुध काढु पण ती गाय वांझ होती. हे राजाला माहिती होते. राजाने संन्याशाला सांगितले की, ती गाय वांझ आहे ती दुध देऊ शकत नाही, तरीही राजाने होकार दिला व संन्याशी हातात कमंडलू घेऊन गायी जवळ गेले,पाठीवर थाप टाकून पाण्याने कास धुतल्याबरोबर गायीला पान्हा फुटला व कमंडलू भरून दुध काढले, नंतर राजाने काही दिवस राजवाड्यात रहाण्यासाठी आग्रह धरला, आग्रहाखातर साधू राजवाड्यात राहु लागले. दररोजच्या कथा, कीर्तनाने राजाच्या मनावर परिणाम झाला व तो सर्व राजवैभवाचा त्याग करून राजा निघून गेला.
सन्याशानी विचार केला की, आपण सन्याशी,हे राज वैभव आपल्या काही कामाचे नाही.आणि साधूंनी एक दत्त भगवानांच्या मूर्तीची स्थापना केली व अशा प्रकारे इथे भगवान श्री दत्त मंदिर झाले.साधु सन्यासी दत्त मंदीरातच रहात होते .कित्येक वर्ष गेली व नंतर त्या सन्याश्यातिल एक सन्याशी महंत श्री नकीपुरी महाराज हे पाकिस्तान या देशातील बलुचिस्तान या परीसरात असणाऱ्या श्री हिंगळजदेवीच्या दर्शनासाठी नित्य नेमाने जात असे त्यांचे गुरु झोपल्यानंतर पक्ष्याच्या रुपामद्ये जाणे व गुरु झोपेतुन उठण्याच्या आत परत येणे .कितीतरी वर्ष काळ उलटला, एके दिवशी श्री हिंगळजदेवीने साधुला दृष्टांत दिला व देवी म्हणाली की, तुझ्या भक्तिला मी प्रसन्न झाले आहे, तू दररोज दर्शनासाठी इकडे येण्याची गरज नाही मी तुझ्या पाठीमागे तुझ्या गावी येण्यास तयार आहे परंतु एक अट आशी आहे की तू पाठीमागे वळून पहायचे नाही वळून पाहील्यास मी जिथपर्यंत आली आसेन तिथेच मी थांबणार पुन्हा कितीही आग्रह केला तरी पुढे येणार नाही.साधू पुढे व देवी त्याच्या मागे येती झाली.असे करत करत साधू हिंगळजवाडी येथील दत्त मंदिरात पोहचला मग त्याने खात्रीपोटी मागे वळून बघीतले की देवी मागे आली की नाही परंतु,देवीने घातलेल्या अटीप्रमाणे देवी वळून पाहील्यामुळे तिथेच थांबली व तिथेच आता श्री हिंगळजदेवी मंदिर आहे.दर मंगळवारी, शुक्रवारी,पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.दर वर्षी चैत्र कृष्ण अष्टमीला यात्रा भरते.याच मंदिरात नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ किशनगारी गुरुराजगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.