नळदुर्ग (प्रतिनिधी)- नगर परिषदच्यावतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 7 कोटी 30 लाख रुपये खर्च करून करण्यात येत असलेली विकास कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश 4 महिन्यांपूर्वी देण्यात आले आहेत. मात्र ती कामे अद्यापही सुरू करण्यात आली नसून ती तात्काळ सुरू करावीत. जर ठेकेदार कामे सुरू करीत नसेल तर ती कामे रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवावी. तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीच्यावतीने दि.9  ऑक्टोबर रोजी नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

नळदुर्ग शहराच्या विकासासाठी नगर परिषदेच्यावतीने विविध फंडातून 7 कोटी 30 लाख रुपये खर्च करून शहरातील विविध भागांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, गटारी, सभागृह व व्यायाम शाळा बांधणे, संरक्षक भिंतीचे काम, गार्डन विकसित करणे यासह विविध कामे  करण्यात येणार होती. या कामांसाठी पारस कन्स्ट्रक्शन कंपनी उमरगा यांना कार्यारंभ आदेश देऊन 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर देखील निम्म्याहून अधिक कामे सुरु केलेली नाहीत. त्यामुळे विकास कामे न करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी बीआरएसचे शहराध्यक्ष अझहर शेख, जिल्हा मिडिया समन्वयक सुनील गव्हाणे, महिला शहराध्यक्ष रंजना ठोंबे, उपाध्यक्ष शांताबाई सोमवसे, शहर सचिव अहमअली मनियार, कस्तुरा चौगुले, अन्वरा शेख, शेखआली शेख, खालेद मौजन, मेहबुब मौजन, कांताबाई मोरे, रेश्मा पवार, कस्तुरा कोळी, कविता निंबाळकर. जैनबी नदाफ, महानंदा धोत्रे, जुलैखा शेख, आयेशा फकीर, रशीद जहागीरदार, रफीक मौजन, हिमायत मौजन, विरेंद्र पाटील, लक्ष्मी धोत्रे, कमलबाई चौगुले आदी सहभागी झाले होते. या उपोषणास शिवसेना (ठाकरे) चे माजी जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण, हेल्थ फार हेल्प मल्टिपर्पज सोसायटी, सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक सुर्यकांत सुरवसे, माजी नगरसेवक बसवराज धरणे यांनी पाठींबा दिला.


 
Top