धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थानच्या अधिनस्थ असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देणेबाबत घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी खा. शरद पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे शिक्षकण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र शासनाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनस्थ असलेल्या माध्यमांच्या शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देण्यासाठी घेतलेला निर्णय ग्रामीण व शहरी भागातील सामान्य गोर-गरीब, मागास, अतिमागास, शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा अधिकाराच एकप्रकारे काढून घेण्याची सुरुवातच आहे असे यावरुन स्पष्ट होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना या निर्णयामुळे शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. तरी हा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा अन्यथा या निर्णयाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.