धाराशिव (प्रतिनिधी)- श्री.तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. प्रत्येक भाविकाला सन्मानाची वागणूक देऊन हा नवरात्र महोत्सव त्यांच्या आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वात सुखद अनुभव असावा याची पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख व मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी आयांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित महाआरोग्य मेळाव्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत केले.
पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, या यात्रा महोत्सवात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून 15 ते 20 लाख भाविक सहभागी होत आहे.राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच कर्नाटक,तेलंगाणा व आंध्रप्रदेश राज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात पायी तुळजापूर येथे येत आहेत. त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. गर्दी नियंत्रण करतांना भाविकांसोबत नम्रतेने वागण्याचे पोलीस आणि सुरक्षा एजन्सीला निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यात्रा कालावधीत वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी असे ही पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी सांगितले.