धाराशिव (प्रतिनिधी)- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 4 हजार रुपये, सोयाबीनला 7 हजार रुपये हमीभाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्र जनजागर यात्रेला सुरुवात झाली आहे. 

जनजागर यात्रेत बोलताना जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की, यावर्षी ऊसाला किमान साडेतीन ते चार हजार प्रतिटन भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर सोयाबीन काढणी खर्च व इतर खर्च मिळून उत्पादनाच्या दुप्पट खर्च होत आहे. त्यामुळे सोयाबीनला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर शहापूर येथील शेतकरी नागनाथ सावकार, दिनेश जगताप, दत्ता व्हंताळे यांनी  जोपर्यंत कारखाने एफआरपी जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊस देणार नाही असे नमूद केले.

त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बाबतीतील सर्व व्यथा मांडल्या. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. यावेळी संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, ज्ञानेश्वर लवटे, मकबूल मुल्ला, भास्कर सुरवसे, नागनाथ सुरवसे, युवराज नवाडे, शहापूर येथील शेतकरी नेते मधुकर लवटे, सुखदेव गोरे, राजेंद्र सुरवसे, गणेश जगताप नसीर पटेल, प्रकाश शिंदे, लक्ष्मण व्हंताळे, परमेश्वर व्हंताळे, शिवाजी जगताप इत्यादी शेतकरी उपस्थित होते.


 
Top