नळदुर्ग (प्रतिनिधी)- “आई राजा उदो, उदो“ चा गजर तसेच घरोघरी घटस्थापना करून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात दि.15 ऑक्टोबरपासुन नळदुर्ग शहर व परीसरात नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. नळदुर्ग येथील प्राचिन व ऐतिहासिक श्री अंबाबाई मंदीरातही नवरात्र महोत्सवास मोठया उत्साहात प्रारंभ झाला आहे. यावेळी अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.15 ऑक्टोबर रोजी सर्वत्र नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. नळदुर्ग शहरातही नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात व भसक्तीमय वातावरणात सुरुवात करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त नळदुर्ग पोलिस ठाणा हद्दीतील 45 ठिकाणी कायमस्वरूपी व सार्वजनिक ठिकाणी श्री देवींच्या मुर्तींची प्रतीष्ठापणा करण्यात आली आहे. नळदुर्ग शहरात एकुण सहा ठिकाणी देवींच्या मुर्तींची प्रतीष्ठापणा करण्यात आली आहे. यामध्ये शिवशाही तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, इंदिरानगर तरुण मंडळ, ब्राम्हण गल्ली व जय भवानी नगर या मंडळांकडुन देवींच्या मुर्तींची प्रतीष्ठापणा करण्यात आली आहे.

नळदुर्ग शहरात नवरात्र महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम प्राचिन व ऐतिहासिक असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिरात होतो. बोरी नदिच्या काठावर वसलेल्या या प्राचिन अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 दि.15 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. मंदिरात घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. दि.16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा. लहान मुलां–मुलींसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाबी. के. शिल्पा दीदी यांचे व्याख्यान, दि.18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा. महिलांसाठी “होम मिनिस्टर“हा कार्यक्रम दि.19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा.तुळजापुर येथील प्रा. दादासाहेब जाधव यांचे श्री तुळजाभवानी शक्ती उपासना या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा.मराठा गल्ली येथील श्री ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळ,महिला भजनी मंडळ व्यासनगर व बाळकृष्ण महिला भजनी मंडळ भवानी नगर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि.21ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते 5 भव्य रांगोळी स्पर्धा मोठा व लहान गट,सायंकाळी 5 वा.आराधी गीतांचा कार्यक्रम व सायंकाळी 6 ते 7 या वेळेत उखाणे स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.दि.22 ऑक्टोबर रोज दुपारी 4 ते 5 कुंकुमार्जन व सायंकाळी सहा वा. कन्या पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दि.23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वा.होमहवन व अजाबली व सायंकाळी 5 वा.परडी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. दि.24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा. सिमोल्लंघन होणार आहे यावेळी देवीची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जगदंबा देवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट व श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्न करीत आहेत. नवरात्र महोत्सवानिमित्त अंबाबाई मंदिरासह शहरांतील सर्वच नवरात्र महोत्सव मंडळानी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.


 
Top