धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या 70 वर्षात गरीब मराठ्यांच्या जीवावर सर्व पक्षातील नेत्यांनी बंगले, गाड्या, आपले साम्राज्य कमावले. गरीब मराठ्यांची परतफेड करण्याची वेळ आता नेत्यांवर आली आहे. सर्व पक्षातील आमदार, खासदार यांनी आरक्षणासाठी प्रयत्न करावा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील जाहीर सभेत केले. यावेळी जरांगे पाटील यांच्या नावे प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरूवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली. त्यापूर्वी त्यांचे जीसीबी मधून फुले उधळून स्वागत करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा समाजातील काही युवक आरक्षणासाठी जीव देत आहेत. याचा विचार ओबीसीसह सर्व पक्षातील नेत्यांनी करावा. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा कायदा करण्यासाठी आधार लागतो असे सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे 5 हजार कागदपत्रे कुणबी मराठा संदर्भात मिळाले आहेत अशी अधिकृत माहिती आपल्या सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येचा मार्ग पत्कारू नये. आरक्षण अंतिम टप्प्यात असून, कोणतेही मतभेद कुणीही करू नये असे आवाहनही त्यांनी केले. या जाहीर सभेस प्रेक्षकांमध्ये आमदार कैलास पाटील, प्रतापसिंह पाटील यांनी उभारून सभा ऐकली.
रात्रभर समाज रस्त्यावर
मनोज जरांगे पाटील यांचे धाराशिव जिल्ह्यात 4 ऑक्टोबरच्या रात्री आगमन झाले. कळंब, येरमाळा, मोहा, मंगरूळ, येडशी, उपळा या ठिकाणी त्यांच्या रात्री 8.30 पासून ते पहाटे 4.30 पर्यंत जाहीर सभा झाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज रात्रभर रस्त्यावर स्वागतासाठी ठिकठिकाणी उभा होता. त्यानंतर गुरूवारी पहाटे 5 वाजता धाराशिव येथील हॉटेल राजासाब येथे मुक्कामाला आले. त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना सलाईन ही लावण्यात आले. त्यानंतर भोजन करून साडेतीन तास त्यांनी झोप घेतली.
समाजाची वेदना सरकारने समजून घ्यावी
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी रात्रभर मराठा समाज रस्त्यावर उभा राहून आपली वाट पाहत होते. अहमदपूरपासून ते धाराशिवपर्यंत 47 गावात लोक वाट पहात थांबले होते. तर 11 गावात सभा झाल्या. 50 हजारपेक्षा जास्त लोक या सर्व सभेला उपस्थित होते. सरकारने मराठा समाजाची ही वेदना समजून घेणे गरजेचे आहे. समाजाने उठाव केल्यास आरक्षण मिळायला दोन दिवसही लागणार नाहीत. परंतु मराठा समाज शांत, सयमी व कायद्याने चालणार आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी आहे असे मतही जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.