धाराशिव (प्रतिनिधी)-आंबी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी सागर सुभाष लेकुरवाळे (वय 28) रा. लंगोटवाडी, ता. परंडा यास परंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी 3 वर्षे शिक्षा व 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली होती.
12 नोव्हेंबर रोजी पोलिस ठाणे आंबी हद्दीतील एका गावातील पीडित ही पाणी आणण्यासाठी जात होती. आरोपी नामे सागर सुभाष लेकुरवाळे याने विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद आंबी पोलिस ठाण्यात दिली होती. फिर्यादीवरून आंबी पोलिस ठाण्यात भा.दं.वि. सं. कलम 354,506 बाल लैगिंक अपराध कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपत्र दाखल केले होते. गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश काळे यांनी आरोपीस दोषी धरून 3 वर्षे कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय अभियोक्ता म्हणून कोळपे यांनी कामकाज पाहिले.