नळदुर्ग (प्रतिनिधी)- हातभट्टी दारू गाळपासाठी प्रसिद्ध असलेल्या तुळजापुर तालुक्यातील पाटील तांड्यावर दि.7 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कारवाई करून तब्बल 3 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून हातभट्ट्या उध्वस्त करून टाकल्या आहेत. या कारवाईचे सर्वसामान्य नागरीकांमधुन स्वागत होत आहे.
नळदुर्ग पोलिस ठाणा हद्दीतील पाटील तांडा हा गेल्या अनेक वर्षांपासुन हातभट्टी दारू गाळपासाठी प्रसिद्ध आहे. या तांड्यावर जुगार अड्डाही मोठ्याप्रमाणात चालतो. याठिकाणी पोलिस कारवाईसाठी गेले तर त्यांच्यासोबत याठिकाणी उद्धटपणे वागले जाते.
धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कांवत व तुळजापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, पिराजी तायवाडे, सुरज देवकर, पोलिस उपनिरीक्षक संजय झिरवाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक पवन मुळे, तानाजी कदम, रघुनाथ कवळे यांनी दि.7 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता मोठा पोलिस फौजफाटा घेऊन पाटील तांड्यावर धाड घातली. यावेळी पोलिसांना पाटील तांड्यात हातभट्टी दारू गाठण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा मोठा साठा मिळुन आला.
यावेळी पोलिसांनी गुरुनाथ नुरा राठोड रा. पाटीलतांडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 3 लाख रुपये किमतीचे हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे 25 बॅरल रसायन नष्ठ करून टाकले. त्याचबरोबर यावेळी पोलिसांनी अनेक हातभट्ट्या उद्धस्त करून टाकल्या.
गेल्या कांही दिवसानंतर पोलिसांनी पाटील तांड्यावर इतकी मोठी कारवाई केली आहे. वास्तविकपाहता अशाप्रकारची कारवाई पाटील तांड्यासह ज्या ठिकाणी हातभट्टी दारू गाळप केली जाते त्या प्रत्येक ठिकाणी वारंवार होणे गरजेचे आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरीकांमधुन स्वागत होत आहे. उत्पादन शुल्क विभागाने तुळजापुर तालुक्यात खुलेआम चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.