धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेणारे साखर कारखाने जोपर्यंत ऊसाचा भाव जाहीर करत नाहीत, तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उसदराच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी नवरात्र कालावधीत तालुकानिहाय जागर बैठकाचे आयोजन केले आहे. सदर बैठकांची सुरुवात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारातून घटस्थापनेच्या दिवशी (दि.15) करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिली आहे. 

धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी गाळपासाठी नेलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाही. तरीही अशा कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. परंतु यावर्षी जोपर्यंत उसाला भाव ठरवून देत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. सध्या पश्चिम महाराष्ट्रात उसाला पाच हजार रुपये भाव मिळावा याबाबत मागणी सुरू आहे.  मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उसाला किमान चार हजार रुपये भाव मिळावा म्हणून ऊस दराच्या प्रश्नावर संघटनेच्या वतीने तालुकानिहाय बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. याची सुरुवात घटस्थापनेच्या दिवशी तुळजाभवानी मंदिरापासून करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी (दि.16) तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. 

 त्यानंतर दि. 17 ऑक्टोबर रोजी धाराशिव, दि.18 कळंब, दि. 19 वाशी, दि. 20 भूम, दि. 21  परंडा,  दि. 22 लोहारा आणि दि. 23  रोजी उमरगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळवायचा असेल तर एकत्र येण्याची गरज आहे. तरी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पक्षभेद, संघटना भेद बाजूला ठेवून फक्त शेतकरी या नात्याने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. इंगळे यांनी केले आहे.


 
Top