धाराशिव (प्रतिनिधी) -निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृती जागविल्या जाणार आहेत. त्यासाठी नळदुर्ग येथे साडेआठ हेक्टर क्षेत्रावर भव्य स्मृती उद्यान साकारले जाणार आहे. सुमारे तीस कोटी रुपयांच्या या स्मृती उद्यानाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
नळदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या आलियाबाद पुलाशेजारी असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर भव्यदिव्य स्मृती स्मारक उभारण्यात येणार आहे. ही जागा हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासोबत प्राथमिक प्रारूप आराखडा देखील सादर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे स्मृती उद्यान उभारले जाणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल, पहिले अशोकचक्र विजेते बचित्तर सिंह, शहीद हवालदार मांगेराम, हरिराजसिंह यांच्यासह या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारकही साकारले जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
लाईट अँड साउंड शो, तत्कालीन इतिहासाची वस्तुनिष्ठ माहिती सर्वांसमोर यावी यासाठी अद्ययावत असे डिजिटल प्रदर्शनही या स्मृती उद्यानात असणार आहे. त्यात रझाकाराच्या अत्याचाराला गाडून टाकण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी गाजविलेल्या असामान्य शौर्याचा अभिमानास्पद इतिहास मांडला जाणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा पुढील 25 वर्षाच्या कालावधीत जिल्हा आणि परिसरात कोणत्या प्रकारचा विकास व्हायला हवा यावर बारकाईने अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यासकेंद्रही प्रस्तावित करण्यात आले आहे. शाश्वत विकासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून सूचना, शिफारशी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी या केंद्राची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक क्षमता अश्या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील एक प्रमुख स्मृती उद्यान आपण उभारू असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.