छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- हिप्परगा (रवा), ता. लोहारा, जि. धाराशिव येथे बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी रू.2.50 कोटीचा निधी देण्याचा निर्णय आज छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आ.सतीश चव्हाण यांनी दिली. 5 सप्टेंबर रोजी आ.सतीश चव्हाण यांनी मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेऊन सदरील बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी विशेष बाब म्हणून रू.2.50 अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे.
हिप्परगा (रवा) हे गाव मराठवाडा मुक्ती संग्राम गरम चळवळीचे प्रमुख ठिकाण होते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1921 साली येथे राष्ट्रीय शाळेची स्थापना करून अनेक स्वातंत्र्य योध्दे तयार करण्याचे काम केले. येथूनच मराठवाडा मुक्ती संग्रामाची बीजे पेरली गेली. मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हे ठिकाण दुर्लक्षीत राहिले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांनी व गावकऱ्यांनी मिळून एक स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणात व राष्ट्रीय शाळेची आठवण म्हणून एक स्मृतिस्तंभ बांधलेला आहे. 17 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्याक्रमासह या दिवशी विविध सामाजिक संघटना, स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस त्या स्तंभास अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र 17 सप्टेंबर हा कालावधी पावसाळी ऋतुत येत असल्यामुळे कार्यक्रम घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले होते.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास भावी पिढीला समजावा यासाठी याठिकाणी सांस्कृतिक सभागृह व म्युझियम/वस्तुसंग‘हालय तसेच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे ग्रंथालय व अभ्यासिका एकाच छताखाली व्हावी यासाठी जुन्या शाळेचे निर्लेखन करून ती जागा या इमारतीसाठी उपलब्ध झालेली आहे. अशा बहुउद्देशीय इमारतीसाठी विशेष बाब म्हणून रू.अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती.
अखेर आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश आले असून आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सदरील बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी 2.50 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील निर्णय घेतल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना.देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
क्रांतीवीर दत्तोबा भोसले स्मारकासाठी 1 कोटीचा निधी
मराठवाडा मुक्तीसंग्रामात अमूल्य योगदान देणारे मातोळा (ता.औसा, जि.लातूर) येथील थोर स्वातंत्र्य सैनानी क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे मातोळा येथे स्मारक उभारण्यासाठी रू.1 कोटीचा निधी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे स्मारक उभारण्यासाठी रू.1 कोटीचा निधी देण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे केली होती.