धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले कर्तव्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे व आरोग्य सुदृढ ठेवलं पाहिजे. यासाठी विद्यार्थ्याना व्यायामशाळा उपलब्ध करून द्यावी, विद्यार्थ्यांना सन्मानाने जगण्यासाठी शैक्षणिक संस्कार व्हावे असे मत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहू शिक्षण  प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालय येथे हैद्राबाद / मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे या होत्या.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड . अविनाशराव देशमुख,, प्राचार्य पी . एन.पाटील, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक एन. व्ही. शिंदे, उपप्राचार्य एन. एम. देटे, पर्यवेक्षक बाळासाहेब मुंडे,, पर्यवेक्षक व्ही. के. देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अविनाशराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाई नरसिंगराव देशमुख व उद्धवराव पाटील यांचे विचार जीवनात अंगीकार करत स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचे स्मरण करत त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य अबाधित राखले जावे यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख नेहमी उंचावत असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवावा असे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थी, शिक्षक, पालक वृंद यांना मराठवाडा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची भाषणे, गीत गायन, चित्र प्रदर्शन असे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती आर. आर. लोकरे आणि श्रीमती एस. एस. शेळके यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही. डब्ल्यू. देशमुख  यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top