धाराशिव (प्रतिनिधी) - मराठवाड्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस असल्यामुळे सर्व पिके वाया गेले आहेत. तर पाणी नसल्यामुळे जल स्त्रोत देखील आटलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सरकार दरबारी आवाज उठवून मराठवाड्याला दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडू असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दि.29 सप्टेंबर रोजी दिले.

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करीत संवाद साधला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, राजाभाऊ हाके, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, तालुका पक्षाध्यक्ष नेताजी जमदाडे, विजय शिरसट, संतोष भोजने, बाळासाहेब मडके, रत्नेश घाटे, नेपते आबा, आदिनाथ काळे आदी उपस्थित होते. 

राजु शेट्टी यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, कळंब तालुक्यात विविध ठिकाणी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व तसेच मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवली आहे. त्या परिस्थितीची दाहकता किती मोठ्या प्रमाणात आहे ? हे सरकार दरबारी मांडण्याचे काम करणार आहेत. तसेच येणाऱ्या काळात सरकारला नक्कीच मरावाडा दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडून वंचित, गोरगरीब शेतकरी यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच अग्रीम विमा मंजूर होऊन सुद्धा देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी जमा झालेला नाही. त्यामुळे ती अग्रीम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.  ती रक्कम जमा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिला. आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कळंब कृषी उत्पन्न समितीच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीस उपस्थित राहून शेतकरी व व्यापारी यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ते बीड जिल्ह्यातील केज येथील मराठवाडा दुष्काळ आक्रोश मेळावा सभेसाठी रवाना झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top