धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याच्या झालेल्या निर्णयामुळे धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण संकुल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या निकषाप्रमाणे व रुग्ण, विद्यार्थी, डॉक्टर्स व कर्मचारी या सर्व घटकांचा विचार करून त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत दिमाखदार इमारत उभारण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ‌‘संकल्पना स्पर्धा' आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन महाविद्यालयाचा अभ्यास करून सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर संकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुणे विभागाचे मुख्य अभियंता  अतुल चव्हाण यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली असून त्यांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.  

सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम एकाच छताखाली आणून परिपूर्ण वैद्यकीय संकुल उभारण्याच्या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये वैद्यकीय शिक्षण संकुल उभारण्याची संकल्पना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडली होती, व ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला.

या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग  बी. एम. थोरात व इतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सदरील बैठकीमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या मापकाप्रमाणे आवश्यक अंतर रुग्ण व बाह्य रुग्ण विभाग, डायग्नोस्टिक सेंटर, प्रशासकीय इमारत, क्लासरूम्स, प्रयोगशाळा, वसतिगृह, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधकामा बाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व घटकांचा विचार करून त्यांना योग्य सुविधा सुलभतेने मिळाव्यात यासाठी संपूर्ण आराखड्यासह डिझाईन बनविण्याचे अनुषंगाने नव नवीन संकल्पना पुढे याव्यात यासाठी ‌‘संकल्पना स्पर्धा (आयडिया कॉम्पिटिशन)' आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, विद्यार्थी व नागरिकांनी देखील त्यांच्या सूचना व संकल्पना लेखी स्वरूपात अधिष्ठाता यांच्याकडे द्याव्यात असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.


 
Top