धाराशिव (प्रतिनिधी) - मुस्लिम समाजाचे मागासलेपणाचे मुख्य कारण हेच आहे. कारण मुस्लिम समाजातील शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या समाजामध्ये अशिक्षितांचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन शिवसेना (बाळासाहेब) अल्पसंख्याक युवक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मेहराज खान यांनी केले. दरम्यान, धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जावेद शेख यांची नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना (बाळासाहेब) अल्पसंख्याक युवक विभागाची आढावा बैठक शहरातील जत्रा फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष जावेद शेख, अमोल पाटील, उत्तम शिंदे (परभणी), काकासाहेब खोत, गोपाळ साखरे, सुनील शिंदे, धाराशिव तालुकाप्रमुख समीर शेख, शहरप्रमुख हबीब खान, अब्दुल सत्तार, अन्सार अन्सारी, मुस्ताक शेख सद्दाम कुरेशी, सुरजित जाधव आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना खान म्हणाले की, मुस्लिम समाजाचा विकास करण्यासाठी आजपर्यंतच्या राजकारण्यांनी केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिम समाजाच्या विकासाच्या बाबतीत करतो, बघतो, करीन या शब्द प्रयोगाशिवाय मुस्लिम समाजाला दुसरे काहीही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आला माणूस, करा काम हे धोरण अवलंबिले आहे. या धोरणानुसार त्यांनी आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या विकासासाठी 5 हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top