धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातील हुतात्मा स्मृती स्तंभ येथे मानवंदना देऊन जिल्हाधिकारी यांचे दीड वर्षीय चिरंजीव कुमार अनय ओम्बासे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. शेष म्हणजे ऑपरेशन पोलो दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीचे शुभारंभ 96 वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून वॉक फॉर नेशन या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या वॉकेथॉन मध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी, एनसीसी आणि स्काऊट गाईड तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या प्रभात फेरीत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याना पुष्पहार आणि माता रमाई आंबेडकर यांचा स्मृती स्तंभास पुष्प अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा मैदानासमोरून परत येत असताना महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या  आणि लहुजी साळवे यांच्या  स्मृतीस्तंभास पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली. 

याप्रसंगी जिल्हा प्रशासाच्यावतीने साहित्यिक युवराज नळे यांनी लिहिलेली मराठवाडा नव्हे भारत मुक्ती संग्राम या पुस्तिकेच्या एक हजार प्रती वितरीत करण्यात आले. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संतोष भोर, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना महेंद्र कुमार कांबळे, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, तहसीलदार प्रवीण पांडे, युवराज नळे, बुबासाहेब जाधव, स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top