धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील नितळी जयलक्ष्मी शुगरकडील ऊसबिलाची थकीत रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी गौरी-गणपती पूजनाच्या दिवशी (दि.22) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदरील कारखाना दुसऱ्या संस्थेला चालविण्यास देण्याच्या हालचाली सुरू असून थकीत रक्कम न मिळाल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नितळी येथील जयलक्ष्मी शुगर या साखर कारखान्याकडे सन 2014 पासून ऊसबिलाची रक्कम थकलेली आहे. सदरील रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सतत पाठपुरावा करुनही अनेक शेतकऱ्यांची बिले अजुनही थकीत आहेत. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम हातातून निघून गेला आहे. म्हणून शेतकरी संकटात सापडला आहे. कारखान्याकडील थकीत ऊसबिल मिळेल या आशेवर असताना ऐन लक्ष्मीपूजनाच्या सणातही शेतकऱ्यांच्या खात्यात लक्ष्मी अवतरली नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या हक्काचे, घामाचे पैसे तात्काळ देऊन आमची हक्काची लक्ष्मी आमच्या झोळीत टाकावी यासाठी गौरी-गणपती पूजनाच्या दिवशी आम्ही निवेदन देत आहोत.

धाराशिवसह लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून ऊस लागवड करुन जयलक्ष्मी शुगर साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. परंतु सन 2014 पासून या कारखान्याकडे ऊसबिलाची रक्कम थकीत आहे. आज ना उद्या बिल मिळेल या आशेवर शेतकरी होते. मात्र सध्या कारखानाही बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या कारखान्याकडे असलेली थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, शेतकरी शिवाजी चव्हाण, देवीदास पवार, महादेव चव्हाण, सुभाष राठोड, भिमराव राठोड, रामचंद्र पवार, गोविंद चव्हाण, मोतीराम राठोड, केशव चव्हाण, योगेश राठोड, विनायक पवार, राजकुमार राठोड, बाबु चव्हाण, दामाजी राठोड, विनायक राठोड, सतीश चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.


 
Top