धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुळजापूर शासकीय आयटीआय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य ध्वजारोहन कार्यक्रम आयएमसी आयटीआयचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्री विश्वकर्मा जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सेनानी श्री.गोविंदभाई श्रॉफ तसेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सकाळी 8.00 वाजता पीएम रन फॉर स्कील या उपक्रमांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉन स्पर्धेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्पर्धकांना हिरावा झेंडा दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये संस्थेतील आजी-माजी 200 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना तुळजापूर राज ऑप्टीकल्सच्या वतीने एनर्जी ड्रिंकची सोय करण्यात आली होती. मॅरेथॉन स्पर्धेनंतर विजेते स्पर्धकांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

त्यानंतर 2021-22 व 2022-23 या वर्षातील उत्तीर्ण प्रशिक्षार्थींना पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचा निकाल 100 टक्के लागल्याने सर्व उत्तीर्ण प्रशिणार्थ्यांचे अध्यक्षांनी अभिनंदन केले व यापुढेही निकालाची हीच परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले.   स्वच्छता पंधरवाडा या अभियानाची सुरुवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने करण्यात आली. या अभियानाचा समारोप 02 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील किल्ल्याची संपूर्ण स्वच्छता करुन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजापूर आयटीआयचे प्राचार्य एम.एस.बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.ए.शेख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top