धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या बस चालकांकडून विविध कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामध्ये नेत्रदोष व इतर शारीरिक आजारामुळे देखील असे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी बस चालकांची मोफत नेत्र व शारीरिक तपासणी करण्यात येत असून याचा लाभ सर्व बस चालकांनी घ्यावा असे आवाहन राज्य उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले.

रस्त्यावर वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या बस चालकांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा शल्य कार्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व शारीरिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बनसोडे, विभाग नियंत्रक चेतना शिरवाडकर, आगार प्रमुख संतोष कोष्टी, मोटार व निरीक्षक दत्तात्रेय पांडकर, श्रीकांत शिंदे, प्रियदर्शनी उपाशी, त्रिवेणी जालींदे, सहाय्यक मोटार व निरीक्षक अजित पवार, कुलदीप पवार, तोडकरी आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना जाधव म्हणाले की, बस चालकांना दैनंदिन कामकाजामुळे नेत्र व शारीरिक आरोग्य तपासणी करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे ते आपल्या आरोग्याची तपासणी करून घेऊ शकत नाहीत. तर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नेत्र व शारीरिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून धाराशिव आगारात कार्यरत असलेल्या बस चालकांची तपासणी करण्यात आली. तसेच या शिबिरामध्ये बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी करून ज्या चालकांना चष्मा लागल्याचे निष्पन्न झाले. त्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोफत चष्मा देण्यात येणार असून इतर काही आजार निष्पन्न झाल्यास त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यालयीन कर्मचारी बालाजी वाघमारे, नरसिंह कुलकर्णी आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top