धाराशिव (प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी बसलेले मनोज जराटे पाटील यांच्यासह बसलेल्या जमावावर पोलिसांनी शुक्रवार दि. 1 सप्टेंबर रोजी अमानुष लाठीमार केला होता. त्यांच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान, किरकोळ प्रकार वगळता बंद शांतते पार पडला.
पोलिसांच्या अमानुष लाठीमाराचा सकल मराठा समाजाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आठ ही तालुक्याच्या प्रतिनिधींनी पाठविलेल्या माहिती नुसार धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम व परंडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. धाराशिव शहरात युवकांनी मोटार सायकल रॅली काढून तर काही ठिकाणी पायी फिरून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. बंदच्या दरम्यान एक-दोन ठिकाणी किरकोळ स्वरूपाची दगडफेक झाली. परंतु पोलिसांनी वेळीच दक्षता घेतली. यावेळी आंदोलन कर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पोलिस अधीक्षक अतूल कुलकर्णी स्वतः जातीने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पूर्व दक्षता म्हणून अनेक ठिकाणी शाळा, कॉलेज व एस. टी. बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अचानक एसटी बस बंद केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व लोकांची गैरसोय झाल्याने खाजगी वाहनाने त्यांना गाव गाठावे लागले. बंदच्या काळात काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता पहायला मिळाली. पोलिस विभागाने सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
परंडा येथेही बेछुट निर्दयी लाठीचार्जच्या विरोधात बंद पाळून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मारहाण प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा !
शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील बांधवांवर शिंदे- फडणवीस-पवार सरकारच्या आदेशाने झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचारी, अधिकारी व शासनातील मंत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यपाल महोदयांना जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. आज बसेस बंद असल्याने तुळजापूर येथे देवीदर्शनार्थ आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.