वाशी (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील नागरिकांची मतदार नाव नोंदणी, जातीचे प्रमाणपत्र,रेशन कार्ड वितरण,तसेच संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या सेवा देण्याचे आयोजन केलेले आहे.याच अनुषंगाने वाशी तालुक्यात ही शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे पारा, वाशी व पारगाव या गावी दिनांक 30, 31 ऑगस्ट 2023 व दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.
सदर शिबिराचे मध्ये वाशी तालुक्यातील अनुसूचित जमाती व भटक्या जमाती तील नागरिकांनी विविध योजनेचा लाभ घेतला यामध्ये जातीचे प्रमाणपत्र 350,नवीन आधार नोंदणी 57, मतदार नोंदणी 158, रेशन कार्ड 132, संजय गांधी निराधार योजना 18 अशी नोंदणी करण्यात आली.तसेच सदर नागरिक यांना ग्रामसेवकाकडून जन्म प्रमाणपत्र,रहिवासी,दारिद्य्र रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र या दाखल्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी श्री.नामदेव राजगुरू, प्रभारी नायब तहसीलदार सचिन पाटील, मंडळ अधिकारी सचिन पवार, मंडळ अधिकारी शिवाजी उंद्रे, मंडळ अधिकारी श्री.दत्तात्रय गायकवाड व कार्यालयीन कर्मचारी,तसेच वाशी तालुक्यातील सर्व तलाठी,सर्व ग्रामसेवक अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस,आशा कार्यकर्ती,कोतवाल, तालुक्यातील सर्व आधार संचालक महा ई सेवा केंद्राचे संचालक उपस्थित होते.आजच्या दिवशी सर्व लाभार्थ्याकडून त्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करून घेतले आहेत.पुढील टप्प्यात हे प्रस्ताव निकाली काढून नागरिकांना महसुली दाखले तसेच रेशन कार्ड आदी प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.सदरील कार्यक्रमास पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले.