धाराशिव  (प्रतिनिधी) - गणपतीचे विसर्जन करण्यासाठी हातलाई तलाव व समता नगर येथील श्री विसर्जन विहीर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी गणपती मूर्ती संकलनासाठी नगर परिषदेची यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दिली आहे.

धाराशिव शहरातील नागरीकांच्या सोयीसाठी जिजामाता उद्यान, छत्रपती शिवाजी हायस्कुल (तांबरी विभाग), नगर परिषद शाळा क्र. 18 (भानु नगर), सांजा चौक (महादेव मंदिर), देवी मंदिर (उंबरे कोठा) व स्वामी समर्थ मंदिर (शाहु नगर) येथे गणपतींच्या मुर्तीचे विधिवत विसर्जनासाठी संकलन केंद्र उभारण्यात आलेली आहेत. त्यासाठी प्रत्येक संकलन केंद्रावर 6 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच हातलाई तलाव व विसर्जन विहीर येथे 2 शिफ्टमध्ये प्रत्येकी 15-15 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच अग्निशमन विभाग व आपत्कालीन व्यवस्थापनचे कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या नजीकच्या गणपती विसर्जन संकलन केंद्राच्या ठिकाणी आपल्या गणपतीची मुर्ती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करुन नगर परिषदेस सहकार्य करुन लाभ घ्यावा. तसेच यंदा अत्यल्प पाऊस असल्यामुळे तलावामध्ये देखील पाणी नाही. गणेश विसर्जन करण्याऐवजी गणेश मूर्ती मूर्तिकारांना द्याव्यात. त्यामुळे पाणी प्रदूषण टाळण्याबरोबरच पर्यावरण पूरक विसर्जन करण्यास मदत होईल असेही फड यांनी सांगितले.


 
Top