तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी संत साहित्याचा समन्वयवाद या विषयावर बोलताना हिंदी विभागातील प्रा विवेकानंद चव्हाण यांनी वरील प्रतिपादन केले.

 आपल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की, मध्ययुगीन काळात भारतीय संताची जी शिकवण आहे त्यावरच भारतीय संस्कृती विकसित झालेली आहे. संत नामदेवांनी अध्यात्मिक विश्वात निर्गुण निराकार ईश्वराची संकल्पना मांडली, वारकरी संप्रदायात देखील या संकल्पनेचा स्विकार केला गेला आहे. आपण तो समजून घेणे आवश्यक आहे. इश्वरीय संकल्पना विश्वात एकच आहे,समाजाने या संकल्पनेचे विभाजन केल्याने मुळ ईश्वरिय संकल्पनेत बदल होणार नाही, वारकरी संप्रदायातील विचार हा सगुण ईश्वराकडून निर्गुण ईश्वराकडे जातो,या संप्रदायात जातीला महत्त्व नाही, यामध्ये सर्व जातितील लोकांचा समावेश आहे हा संतांचा समन्वयवादी सिध्दांत आहे,संत कबीरांनी देखील ज्ञानावर आधारित निर्गुण ईश्वराची संकल्पना मांडत असताना जो अध्यात्मिक रहस्यवाद मांडला त्यामध्ये मध्यमा,ईडा आणि पिंगला नाडीचा व पंच महाभूतांचा संदर्भ आढळून येतो. ही विशेषता प्रत्येक व्यक्तीत आढळून येते, त्यामुळे इथेही जात पात या बाबीस स्थान नाही,भक्ती करण्याचा सर्वांना समान अधिकार हा एक समन्वयवाद आहे. त्यामुळे आधुनिक व वैज्ञानिक युगात नव्याने ज्या अध्यात्यिक बाजू मांडल्या जात आहेत त्याचे मुळ मध्ययुगीन संत साहित्याचा आधार घेऊन निर्माण होताना आपण बघत आहोत, म्हणुनच आज संत नामदेव,संत कबीर,संत ज्ञानेश्वर किंवा संत तुलसीदास यांचे अध्यात्मिक प्रवाह आपण समजून घेणे गरजेचे आहे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांनी यावेळी भारतीय संत साहित्य हे लोक कल्याण भावनेने ओतप्रोत असल्याचे सांगितले,अध्यात्मिक संप्रदायात सांगितला गेलेला रहस्यवाद हा बुध्दीप्रामाण्यवादावर आधारित असल्याने समाजाने तो स्विकारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ बालाजी गुंड यांनी केले, यावेळी डॉ मेजर वाय. ए. डोके, प्रा. धनंजय लोंढे यांच्या सह सर्व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले तर आभार डॉ बालाजी गुंड यांनी मानले.


 
Top