धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात अवर्षणामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देऊन चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा पशुधनासह जिल्हाधिकारी कार्यालयात बसून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीपोटी एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी, पीकविम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम तातडीने मंजूर करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावी, पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात,  पशुपालक शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ देण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, तुळजापूर तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष नेताजी जमदाडे, विजय सिरसट यांची स्वाक्षरी आहे.


 
Top