धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपा नेते बसवराज मंगरुळे यांनी गेल्या काही महिन्यांपासून गाठीभेटीचा सपाटाच लावला आहे. त्यातच, गणेशोत्सव काळातही ते मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरती व पूजेला उपस्थित राहिल्याचे दिसून आले. यावेळी, अनेक ठिकाणी त्यांनी राजकीय चर्चाही केल्याचे समजते. धाराशिव शहरासह ग्रामीण भागातील तरुण गणेश मंडळांना भेटी देत मंगरूळे यांनी संपर्क अभियानच राबवल्याचं पाहायला मिळालं. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांची जोरदार तयारी सुरू असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
मंगळवारी हिंदवी प्रतिष्ठान गणेश मंडळ, ओमनगर या गणेश मंडळाने स्थापन केलेल्या गणरायाची आरती बसवराज मंगरुळे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांनी धाराशिवमधील स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. अनेक वर्षे रखडलेल्या पण सध्या पूर्ण झालेल्या धाराशिव बेंबळी- उजनी रोडच्या उर्वरित कामाचा चर्चेतून आढावा घेतला. तर, धाराशिव लोकसभा मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधला. यंदा पाऊस कमी झाल्याने पुढील काळात पाणी टंचाई जाणवू शकते या अनुषंगाने पाणी जपून वापरण्याचे आवाहनही नागरिकांना केले. मंगरुळे हे मतदारसंघात 10 दिवस ठाण मांडूनच बसले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, त्यांसमवेत अध्यक्ष धनाजी आप्पा पवार, अनिल सावंत सौरभ डांगे किशोर पवार, सोबत ॲड. खंडेराव चौरे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, रूपचंद कारडामे, जितेंद्र नाईकवाडी, शिवा संघटना धाराशिव उपाध्यक्ष नितीन लगदिवे, सुरज सगरे व इतर मान्यवर उपस्थित होते.