धाराशिव (प्रतिनिधी)- निजामाच्या जोखडातून मायभूमीला मुक्त करण्यासाठी अनेकांनी जीवाची बाजी लावली.प्रसंगी प्राणाची आहुती दिली.रजाकराच्या जोखडातून सर्व सामान्यांना मुक्त केले. आणि देशाच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले. अंगावर रोमांच उभे करणारा हा सगळा प्रवास धाराशिवकरांनी याच देही याच डोळी अनुभवला. यावेळी धाराशिव येथील नाट्य रसिक मंत्रमुग्ध झाले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'गाथा मुक्ती संग्रामाची' या नाटकाचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील सर्व आठ ही तालुक्यात करण्यात आले आहे. या नाटकाचा तिसरा प्रयोग बुधवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार प्रविण पांडे शिक्षण विस्तार अधिकारी मेंदर्गी, साहित्यिक युवराज नळे,जिल्हा समनव्यक विशाल शिंगाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाट्यप्रयोगाचे उदघाटन करण्यात आले.
या नाटकाचे लेखन डॉ.सतीश साळुंके व शैलेश गोजमगुंडे यांनी तर डॉ.गणेश शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे.यातील कलाकारांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील आठवणींना उजाळा दिला.अभिनयाचे सादरीकरण पाहताना प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले होते.अप्रतिम अभिनयाद्वारे कलाकारांनी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ , वेदप्रकाश आर्य, निजाम,कासीम रजवी, माणिकचंद पहादे, पांडू हजाम यांच्या भूमिका जिवंत केल्या. प्रत्येक संवादाला मिळणारी दाद जणू कलाकारांना रसिकतेची पोहोचपावतीच देऊन गेली.
प्रास्ताविक राजेंद्र अत्रे यांनी तर आभार विशाल शिंगाडे यांनी व्यक्त केले. यावेळी धाराशिव तालुक्यातील शासकीय अधिकारी- कर्मचारी, विविध संस्थाचे पदाधिकारी,महिला, पुरुष, मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नाट्य प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी विशाल टोले, सागर चव्हाण, सुगत सोनवणे, तन्मय शेटगार,आकाश वाघमारे,अशोक घोलप, बाहेर शेख, सुमित शिंगाडे, सौरभ शिंगाडे, अजय चिलवंत यांनी परिश्रम घेतले.