धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या युवकांच्या आमरण उपोषणस्थळी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी आरक्षण द्या किंवा राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान आरक्षणासह पीकविमा व दुष्काळी अनुदानासाठी घोषणा देणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटकाही केली. त्यानंतर परत आज मंगळवारी पालकमंत्र्यांच्या विरोधात त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले.
जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथील दोन युवकांनी गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सावंत जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यादरम्यान त्यांनी उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या अन्य मराठा कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण देता येत नसेल तर राजीनामा द्या अशा घोषणा दिल्या. यामुळे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. यानंतर डॉ. सावंत यांनी सहा महिने थांबलात तसे सहा तास थांबा, 7.30 ला होणाऱ्या बैठकीत तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही दिली. परंतु काही तोडगा न निघाल्यामुळे मराठा समाजातील युवक वर्गात असंतोष पहायला मिळाला. त्यामुळेच मंगळवारी पालकमंत्री सावंत यांचा पुतळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळण्यात आला.
सहा महिन्यापूर्वी सांगितले होते
पालकमंत्री तानाजी सावंत यांनी उपोषणस्थळी जमलेल्या लोकासमोर बोलताना आपण सहा महिन्यापूर्वीच सरकारला मराठा आरक्षण संदर्भात सांगितले होते. मराठा आरक्षण प्रश्न गंभीर होवू शकतो याची कल्पना दिली होती असा दावा पालकमंत्री सावंत यांनी सर्वांसमोर केला.