धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षक शालेय अभ्यासक्रम शिकवितात. त्यातील अनेक संदर्भ व संकल्पना विद्यार्थ्यांना समजत नाहीत. विद्यार्थी मात्र शिक्षकांच्या भीतीपोटी तो धडा पूर्णपणे समजल्याचे सांगतात. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना त्याची संकल्पना न कळल्यामुळे ते गोंधळून जातात. त्यामुळे तो संदर्भ व संकल्पना समजून घेऊन व्यवस्थित अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळाल्याशिवाय राहत नाही असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि.13 सप्टेंबर रोजी व्यक्त केला.

जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथील श्री सिद्धेश्वर निवासी विद्यालयाच्या प्रांगणात अटल घण अर्थात ऑक्सिजन पार्कचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी विश्वासराव करे, सहाय्यक वन संरक्षक रोहन चोबे, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मालखरे, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, सचिव दिलीप गणेश, संचालक उमाजी देशमुख,बी.आर.सुर्यवंशी, संतोष नलावडे, सहाय्यक वनसंरक्षक रोहन चोबे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष बोडके,गट शिक्षण अधिकारी असरार सय्यद, बावी केंद्रप्रमुख चिलवंते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ ओंबासे म्हणाले की, विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही असे शासनाचे दंडक असल्यामुळे विद्यार्थी हुशार आहेत किंवा नाही याकडे पाहिले जात नाही. त्यामुळे शिक्षकांनी अध्यापन निष्पत्ती याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण ज्या विद्यार्थी गणित, विज्ञान व इंग्लिश आदी विषयांमध्ये अप्रगत आहेत, अशा विद्यार्थ्यांना वर्गातच विशेष ध्यान देऊन त्यांना प्रगत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने झाडे लावलेली असून त्या झाडाचे व इतर झाडांचेही जपने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच त्या झाडापासून मानवालाच फळे मिळणार असून त्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मोबाईल प्रत्येकाकडे असून त्याचा वापर चांगल्या कामासाठीच करावा, असे आवाहन डॉ ओंबासे यांनी केले.

विभागीय वन अधिकारी करे म्हणाले की, वृक्ष लागवड करून निसर्गाची सेवा करावी. तसेच पर्यावरणसृष्टी नष्ट झाली तर मनुष्यसृष्टी देखील नष्ट होते. सध्या पर्यावरणाचा समतोल ढासलेला असल्यामुळे तो समतोल वाढविणे आवश्यक आहे. तसेच निसर्ग संपदेचे संरक्षण व वन संरक्षण करणे ही देश सेवा आहे. तसेच एक वृक्ष लावणे म्हणजे दहा मुलांना जन्म देण्यासारखेच असल्याचे सांगत वन विभागाबरोबरच नागरिकांनी देखील वृक्ष लागवड व त्याची जपणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर विद्यार्थिनींनी स्वागत गीत व हैद्राबाद मुक्ती संग्राम गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच असे झुंजलो आम्ही या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब जाधव यांनी तर सूत्रसंचालन महादेव कांबळे यांनी व आभार मुख्याध्यापक आबाजी सरवदे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top