कळंब (प्रतिनिधी)- 21 दिवसात अडीच मिमी पाऊस, हा पीकविमा कंपनीच्या सोयीचा निकष आहे. मंडळातील पर्जन्यमापक यंत्रावर यांचा विश्वास आहे परंतु शेतकऱ्यांवर नाही. कधी या बांधाचा पाऊस दुसऱ्या बांधावर नसतो. पर्जन्यमापक यंत्राऐवजी पिकाची परिस्थिती बघून निर्णय घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निकष बदलण्यासाठी पत्र दिले आहे. कंपनीच्या सोयीचे निकष आहेत, त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजना गुजरातमध्ये नाही. तसेच एका रूपयात शेतकऱ्यांचा पीकविमा उतरला खरा, परंतु या मागचा सरकारचा डाव वेगळाच असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला.
कळंब तालुक्यातील वाळलेल्या सोयाबीन पिकाची आमदार कैलास पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाळत आहे. या संदर्भात आमदार कैलास पाटील अंदोरा व देवळाली येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वाळलेल्या पिकाची पाहणी केली. यावेळी प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे, अंदोरा येथील सरपंच बळवंत तांबारे, उपसरपंच दत्तात्रय तांबारे, सदस्य नितीन तामाने, राजेश कवडे, कालिदास तांबारे, दादा कदम, झुंबर बाराते, राजेश लांडगे, देवळाली येथील शेतकरी उपस्थित होते.