धाराशिव (प्रतिनिधी)-जनता सरकार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची राजस्थानमधील नांगल चौधरी टोलनाक्यावर अडवणूक करून हल्ला केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव तालुक्यातील येडशी टोलनाका येथे जनता सरकार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. निषेधाचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. अखेर वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर निवेदन स्वीकारण्यात आले.

जनता सरकार मोर्चाचे डॉ.देवेंद्र बल्हारा, सुनील शर्मा, रवींद्र भारतीय, वीर सिंह व इतर पदाधिकारी व कार्यकर्यांना राजस्थानमधील नांगल चौधरी येथील टोलनाक्यावर अडविले. येथे त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारीधुळे-सोलापूर महामार्गावरील धाराशिव तालुक्यातील येडशी येथील टोलनाक्यावर नवनाथ दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले होते. तेथे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने दुधाळ यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर निवेदन स्वीकारण्यात आले. यावेळी कार्यकर्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इन्कलाब जिंदाबाद, भारतातील सर्व टोलनाके बंद झाले पाहिजेत, भारत माता की जय अशा घोषणा कार्यकर्यांनी दिल्या.

यावेळी बोलताना नवनाथ यांनी जनता सरकार मोर्चाच्या कार्यकर्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, डॉ. देवेंद्र बल्हारा हे शेतकरी कर्जमुक्तीसाठी काम करत आहेत. म्हणून त्यांच्यावर खाजगी लोकांमार्फत सरकारमधील व्यक्तींनी भ्याड हल्ला घडवून आणला असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्व टोलनाके बंद करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी जनता सरकार मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top