धाराशिव (प्रतिनिधी)- पारधी समाजातील युवक-युवतींनी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे. आज या समाजाकरिता मोठमोठ्या संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घेऊन स्वतःची आणि समाजाची उन्नती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.

धाराशिव शहरातील आदिवासी पारधी समाजातील तरुणांनी स्थापन केलेल्या जय अंबे तरुण गणेश मंडळाच्या गणराय मूर्तीचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांचे माता-पिताश्री सौ. कुसुमताई व श्री. छगनलाल ओंबासे यांच्या हस्ते आरतीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा मंडळाचे मार्गदर्शक सुनील काळे व इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे म्हणाले की, बदल हा एका दिवसात घडून येत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. इतर समाजातील लोकांना त्याची जाणीव झाली आहे. म्हणून तो समाज पुढे गेला आहे. त्यांच्याप्रमाणे पारधी समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन स्वतःची आणि समाजाची प्रगती साधावी, असेही ते म्हणाले. जय अंबे तरूण गणेश मंडळाच्या वतीने 'शासन आपल्या दारी' योजनेबाबत जनजागृती केल्याबद्दल मंडळाचे मार्गदर्शक सुनील काळे यांचे कौतुक जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ओंबासें यांच्या मातोश्री सौ. कुसुमताई व पिताश्री छगनलाल ओंबासे यांनीही आपल्या मनोगतात तरुणांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. गणरायाच्या आरती पूजनानंतर आदिवासी पारधी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते गुलेर आणि पेनची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी पारधी समाज हा शिकारीपासून परावृत्त होऊन लेखणीकडे वळल्याचे या प्रतिमेद्वारे व्यक्त झाल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. आभार आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांनी मानले. यावेळी माजी नगरसेवक बापू पवार, गणेश मंडळाचे पदाधिकारी रोहीत काळे, अरूण काळे, दत्ता चव्हाण, नाना पवार, दिलीप चव्हाण, संतोष काळे, पंकज काळे, सोलापूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सरतापे, नितेश काळे, शिवकुमार बनसोडे, रणजीत गायकवाड, संजय काळे, रवी काळे, सुरेश काळे, दादा पवार, कमलाकर पवार तसेच आदिवासी पारधी महिला, पुरूष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top